
पुणे: हवामान बदलामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने शालेय विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘ पुणे हवामान योद्धा’ ( पुणे क्लायमेट वॉरियर ) या उपक्रमाचे यंदाचे हे तिसरे पर्व आहे. वर्षभर चालणाऱ्या या उपक्रमात मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू या सर्व माध्यमातील सुमारे ८० शाळा आणि वर्षभरात ४० हजार विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी होतात.
‘अलर्ट’ ( Association for Leadership, Education Research and Training ) च्या ‘पुणे क्लायमेट वॉरियर या उपक्रमाच्या तिसऱ्या पर्वाचा समारोप यंदा ‘ बिग ग्रीन इव्हेंट ‘ या पर्यावरण विषयक महोत्सवाने होणार आहे.पुणे महापालिका, कमिन्स इंडिया आणि जनवाणी यांच्या सहकार्याने आयोजित हा ‘बिग ग्रीन फेस्ट’ दि १८ जानेवारी २०२५ रोजी पं. जवाहरलाल नेहरू सभागृह, घोले रस्ता येथे सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत संपन्न होणार असून प्रवेश विनामूल्य आहे .
पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत माजी खासदार आणि ‘अलर्ट’च्या संस्थापक वंदना चव्हाण, पुणे महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे उपआयुक्त संजय शिंदे, पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे, ‘ पुणे क्लायमेट वॉरियर’ च्या मुख्य समन्वयक एड.दिव्या चव्हाण – जाचक, ‘सृष्टी’चे अध्यक्ष सचिन नाईक, स्वप्नील दुधाणे, हर्षदा अभ्यंकर यांनी या महोत्सवाबद्दल माहिती दिली.
‘जंगलाचे रक्षक ‘, ”कचऱ्यातून संपत्ती’,’ ‘हवामान बदलाचे पडसाद’ व ‘शाश्वत भविष्य’ या विषयांना अनुसरून वेषभूषा स्पर्धा /फॅशन शो (11.30 ते 2.30), पोस्टर स्पर्धा, नृत्य, पथनाट्य व पर्यावरण गीतांचे सादरीकरण, कापडी पिशवी रंगविणे व टेरेरियम कार्यशाळा ( 10 ते 3), शाळांचे व पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत असणाऱ्या संस्थांचे स्टॉल्स(10 ते 6), पर्यावरण पूरक वस्तूंची विक्री आणि
श्री अनुज खरे व श्री सतीश खाडे यांचे अनुक्रमे ‘ सिमेंटच्या पलीकडे – पुण्यातील वन्य वैभवाचा शोध ” व ‘छत्रपती शिवाजी महाराज – पर्यावरण संवर्धनाचे प्रणेते’ या विषयावर व्याख्यान ( 3 ते 5) अशा भरगच्च कार्यक्रमाने सजलेल्या या महोत्सवात शालेय विद्यार्थी, शिक्षक, पालक व पर्यावरणप्रेमी पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.