
पुणे, ता. १४: बदलते वातावरण आणि अनैसर्गिक जीवन पद्धतीमुळे महाराष्ट्रात कॅन्सर रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. महागड्या उपचारांमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त, कर्जबाजारी झाले आहेत. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना दिलासा व आधार देण्यासाठी रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने कॅन्सरमुक्त महाराष्ट्र अभियान हाती घेण्यात आले असून, या अभियानांतर्गत कॅन्सरवरील महागडे उपचार मोफत करण्यात येणार आहेत, अशी माहिती कॅन्सरमुक्त महाराष्ट्र अभियानाचे प्रमुख तथा रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी युनिव्हर्सल हॉस्पिटलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. स्मिता भोयर, होप हॉस्पिटल अँड कॅन्सर सेंटरचे मुख्य संचालक डॉ. अमोल देवळेकर, कॅन्सर विभागप्रमुख डॉ. अमोघसिद्धी भांडारकर, रुग्ण हक्क परिषदेचे केंद्रीय सल्लागार माजी सहायक पोलीस आयुक्त मिलिंद गायकवाड, परिषदेच्या पुणे शहराध्यक्ष अपर्णा मारणे साठे, अमोल हुलावळे आदी उपस्थित होते.
उमेश चव्हाण म्हणाले, “सध्या स्त्रियांमध्ये स्तनाचा, पिशवीचा कॅन्सर प्रचंड प्रमाणात वाढला आहे. तोंडाचा, जिभेचा, रक्ताचा, मेंदूचा, अंडाशयाचा, त्वचेचा कॅन्सर बळावत आहे. तसेच शरीरावर विविध ठिकाणी येणाऱ्या गाठी कॅन्सरच्या असल्याचे निदर्शनास येत आहे. सध्या पुण्यात लाखो रुग्ण कॅन्सरवरील उपचार घेत आहेत. कॅन्सरवरील उपचार घेताना रुग्णांना आर्थिक तडजोड करतानाच कर्जबाजारी व्हावे लागत आहे. अनेक कुटुंबांवर गाडी, दागिने, राहते घर विकून उपचार घेण्याची वेळ येत आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन हे अभियान हाती घेण्यात आले आहे.”
“कॅन्सरसाठीची केमोथेरपी, इमिनोथेरपी, कॅन्सरचे ऑपरेशन, रेडिएशन, आवश्यक औषधे व इंजेक्शन यांच्या किमती लाखो रुपयांच्या घरात आहेत. सर्वसामान्य माणसाला हे उपचार परवडणारे नाहीत. त्यामुळे कॅन्सरमुक्त महाराष्ट्र अभियानांत कॅन्सरवरील केमोथेरपी आणि ऑपरेशन शासकीय योजनांच्या माध्यमातून पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत. पुण्यातील शनिवारवाडाजवळ असलेल्या युनिव्हर्सल हॉस्पिटल आणि नाना पेठेतील होप हॉस्पिटल अँड कॅन्सर सेंटर येथे ही मोफत उपचार सुविधा उपलब्ध असणार आहे. अधिक माहितीसाठी रुग्णांनी व नातेवाईकांनी ९८५०००२२०७ या क्रमांकावर संपर्क साधावा,” असे आवाहन उमेश चव्हाण यांनी केले आहे.