
मुंबई: महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांना आज तुषार तानाजी कांबळे, सचिव – महाराष्ट्र प्रदेश (आरपीआय) आठवले श्रमिक ब्रिगेड यांनी मुंबईत भेट घेतली . या भेटीत कोयना धरण प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यात आली.
कोयना धरण बांधताना परिसरातील शेतकऱ्यांची जमीन हस्तांतरित करण्यात आली होती. मात्र, संबंधित काही शेतकरी व नागरिकांना अद्यापही शासनाने ठरलेल्या नियमांनुसार पर्यायी जागा, आर्थिक मदत, तसेच शासकीय नोकऱ्यांमध्ये समावेश या मागण्या मान्य केल्या नाहीत. परिणामी, प्रकल्पग्रस्तांना वर्षानुवर्षे मोबदल्याविना संघर्ष करावा लागत आहे.
तुषार तानाजी कांबळे यांनी मंत्री मकरंद पाटील यांना सादर केलेल्या निवेदनात प्रकल्पग्रस्तांना तात्काळ न्याय मिळवून देण्याची मागणी केली. या प्रसंगी शेखर गोयल, अपर्णा म्हेत्रे आणि सागर जगताप यांसारखे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मंत्री महोदयांनी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करून लवकरच योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.