
पुणे: “भारतीय संविधानाचा मुलाधार ही भारतीय संस्कृती आहे. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाची निर्मिती केली आहे.भारतीय संविधानाची निर्मिती करत असताना बुद्ध, माहावीर , सम्राट अशोक आणि भारतीय ऋषींचा विचारांचे सुत्र स्वीकारले गेले आहे. या संविधान निर्मितीमधून परंपरा आणि परिवर्तनशीलतेचा समन्वय साधुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आधुनिक भारतीय संविधानिक समाजाच्या निर्मितीचा पाया रचला आहे. स्वतंत्र भारताला संविधानाची गरज असल्याचा उल्लेख मानवेंद्रनाथ रॉय यांनी केला असला तरी त्या अगोदर स्वतंत्र भारतासाठी पहिल्यांदा संविधान निर्मितीचा प्रयत्न हा लोकमान्य टिळकांनी केल्याचा उल्लेख सापडतो. भारतीय संविधान हे समता बंधुता न्याय आणि स्वातंत्र्य या तत्त्वावर उभारल्यामुळे समाजातली एकात्मता भाव चिरकाळ टिकून राहणारा आहे. प्रत्येक भारतीयांना संविधानाबद्दल अभिमान वाटला पाहिजे. आज देशाच्या संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाले असले तरी भारतीय समाजातील मोठा समूह हा संविधान साक्षरतेपासून वंचित आहे. या समूहाला संविधान साक्षर करणे हे राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टिने फार गरजेचे आहे.त्यामुळे या 75 व्या महोत्सवानिमित्त वर्षेभर संविधान साक्षरतेचे वर्ग होणे गरजेचे आहे. त्यातून एक सदृढ ,सजग व सशक्त समाज निर्माण होईल आणि भारत राष्ट्र हे जगामध्ये विश्वगुरू ठरेल.”असे प्रतिपादन मातंग साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.धनंजय भिसे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकार मंडळाने आयोजित केलेल्या देशाच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात केले. यावेळी सावरकर मंडळाचे कार्याध्यक्ष रमेशजी बनकोंडे, प्रमुख पाहुणे उद्योजक दासोपंत गोस्वामी, सावरकर मंडळाचे सदस्य विकास देशपांडे, राजेंद्र देशपांडे समरसता गतवीधीचे प्रमुख प्रदीप पाटील व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.