
पुणे: पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या पिंपरी चिंचवड येथील निसर्गराजा मित्र जीवांचे या संस्थेचा १६ वा वर्धापनदिन संस्थेच्या इंजिनिअरिंग क्लस्टर , चिंचवड येथील निसर्गराजा नर्सरी मध्ये उत्साहात साजरा झाला.
या कार्यक्रमाला रंगनाथ नाईकडे, संचालक, यशदा तसेच भारतीय वनसेवा (निवृत्त) हे अध्यक्ष तर दया ओगले साईट हेड TomTom (I) Pvt.Ltd या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होते.
पर्यावरण क्षेत्रात एकट्याने काम करणाऱ्या व्यक्तीस संस्थेच्या वतीने दर वर्षी “मित्र जीवांचे” हा पुरस्कार दिला जातो. ५ हजार रुपये आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असते.
या वर्षीचा पुरस्कार कराड येथील निवृत्त विज्ञान शिक्षक डॉ. सुधीर कुंभार यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
पर्यावरण क्षेत्रात काम करताना ज्याला जे येतंय त्याने त्याचा उपयोग पर्यावरण सेवा करण्यासाठी केला पाहिजे. Think Globally and Act personally हे धोरण प्रत्येकाने आपल्या रोजच्या आयुष्यात आंगिकारले पाहिजे असे विचार डॉ. कुंभार यांनी पुरस्काराला उत्तर देताना मांडले.
यावेळी गेल्या वर्षभरात संस्थेच्या विविध उपक्रमांत सातत्यपूर्ण योगदान देणाऱ्या संकेत पाटील आणि राकेश सोनमळे या संस्थेच्या स्वयं सेवकांना विशेष कार्यगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.
तसेच गेल्या वर्षभरातील संस्थेच्या माध्यमातून राबवलेल्या उपक्रमांत महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या सहयोगी संस्थांचा देखील सन्मान या वेळी संस्थेच्या वतीने करण्यात आला.
संस्थेच्या आत्तापर्यंतच्या कार्याचा आढावा श्री. सागर वाघ यांनी त्यांच्या प्रास्ताविकात सादर केला तसेच श्री. राहुल घोलप यांनी गेल्या वर्षभरात राबवलेल्या ग्रीन कॅम्पस या उपक्रमाचे सादरीकरण केले.
तसेच मोफत प्लेट बँक या नवीन उपक्रमाची सुरुवात संस्थेच्या वतीने आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष रंगनाथ नाईकडे यांनी पर्यावरण पूरक जीवन शैली ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, प्रत्येकाने आपापल्या दिनचर्येत छोट्या छोट्या गोष्टी कटाक्षाने पाळल्या तर पर्यावरण संवर्धन करणे शक्य होईल हे संत साहित्यातील अनेक उदाहरणं देऊन उपस्थित जन समुदायाला पटवून दिले.
या वेळी संस्थेच्या नर्सरी मध्ये संस्थेच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती पोस्टर आणि स्लाईड शो च्या माध्यमातून आलेल्या जन समुदायाला देण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मारुती साळुंखे यांनी केले तर माणिक धर्माधिकारी यांनी आभार प्रदर्शन केले.