
गोंदिया: जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे, जिथे दारू पाजल्यानंतर नशेच्या अवस्थेत कोयत्याने गळा चिरून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. अनैतिक संबंधातून हा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही घटना आमगाव तालुक्यातील सावंगी पदमपूर शेतशिवारात घडली आहे.
आज सकाळी आमगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत सावंगी पदमपूर शेतशिवारात एका तरुणाचा अर्धवट गळा कापलेला मृतदेह आढळला. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आणि एका आरोपीला अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव श्रवण सोनवणे (वय 25) असे आहे.
काय घडले नेमके?
मृत नरेश चौधरी आणि आरोपी श्रवण सोनवणे हे एकाच गावातील रहिवासी होते. काल रात्री दोघेही आमगाव येथे गेले होते. तिथून त्यांनी दारू घेतली आणि पदमपूर शेतशिवारात जेवणाचा बेत आखला. मद्यप्राशन झाल्यानंतर, श्रवणने नरेश बेसावध असताना अचानक कोयत्याने त्याच्या गळ्यावर वार केले, ज्यामुळे नरेशचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांचा जलद तपास, आरोपी गजाआड
आज सकाळी मृतदेह आढळताच पोलिसांनी तपासाच्या हालचाली वेगवान केल्या. प्राथमिक तपासानंतर अनैतिक संबंधातून हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, संबंध नेमके कुणाचे होते, याची माहिती अद्याप पोलिसांनी जाहीर केलेली नाही.
सध्या पोलीस अधिकारी प्रमोद मडामे आणि पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.